जमशेदपूरच्या धर्तीवर गडचिरोलीचा औद्योगिक विकास - अजित पवार
By संजय तिपाले | Published: December 17, 2023 04:52 PM2023-12-17T16:52:21+5:302023-12-17T16:52:37+5:30
झारखंडमधील जमशेदपूरचा स्टील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला.
गडचिरोली : झारखंडमधील जमशेदपूरचा स्टील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्या शहराला नवी आळख मिळाली. त्याप्रमाणेच नक्षलग्रस्त गडचिरोलीचाही विकास होईल. नवनवीन प्रकल्प येत आहेत. येथील खनिज संपत्तीतून स्टील निर्मितीसारखे प्रकल्प उभारत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
कोनसरी (ता.चामोर्शी) येथील लॉयड मेटल्सच्या नियोजित स्टील निर्मिती प्रकल्पास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम समवेत होते. कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी प्रकल्पस्थळी लोहखनिजापासून स्टील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. प्रकल्पाच्या उभारणीचे टप्पे, एकूण खर्च, रोजगार निर्मिती आदी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात उच्च दर्जाचे खनिज आहे. त्यातून स्टील निर्मितीसारखे प्रकल्प उभे राहत आहेत, ही औद्योगिक क्रांती आहे. नक्षलग्रस्त भागात स्थानिकांना रोजगाराची साधने फारशी नाहीत, त्यामुळे अशा उद्योगांतून नवीन संधी निर्माण होतील. गडचिरोलीतील नियुक्तीकडे अधिकारी शिक्षेच्या स्वरुपात पाहत. मात्र, अशा प्रकल्पांमुळे ती ओळख पुसली जाणार आहे. नामांकित कंपन्यांनी जमशेदपूरमध्ये उद्योग उभारल्याने त्या शहराचा विकास झाला, त्याप्रमाणेच गडचिरोलीचाही विकास होईल. उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असून समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून गडचिरोली व चंद्रपूरला जोडण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय रेल्वेमार्गातूनही दळणवळणाचे साधन निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उप पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
अतिदुर्गम नारगुंडा गावाला भेट
अधिवेशनानिमित्त नागपूर मुक्कामी असलेेले उपमुख्यमंत्री अजित पवार हेलिकॉप्टरने नारगुंडा (ता.भामरागड) या अतिदुर्गम गावात पोहोचले. मंत्री धर्मरावबाबा आत्राम त्यांच्या समवेत होते. यावेळी तेथे पोलिसांच्या वतीने आयोजित जनजागरण मेळाव्यास त्यांनी उपस्थिती लावली. आदिवासींशी संवाद साधून पवार यांनी पोलिस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना विविध जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर हेलिकॉप्टरनेच ते कोनसरी प्रकल्पस्थळी पोहोचले. गडचिरोली शहरात अधिकाऱ्यांशी संवाद साधून नंतर ते नागपूरला परतले.