गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात डेंग्यू व अन्य साथीच्या रोगाने १० ते १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साथरोग अधिकारी हे पद असून या अधिकार्यांकडे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी आरोग्य विभागातील अनेक अतिरिक्त काम लादून दिलेले आहेत. त्यामुळे साथरोग अधिकार्याचे साथीच्या नियंत्रणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच साथीच्या रोगाने अनेकांचा मृत्यू होत आहे. साथरोग अधिकार्यांकडे असलेले अतिरिक्त कामे त्वरीत काढून घेण्यात यावे, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील दीड वर्षात कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा, आरमोरी तालुक्यातील शिवणी, अहेरी तालुक्यातील देचलीपेठा, मेडपल्ली, गोविंदगाव, गडचिरोली तालुक्यातील पुलखल, चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे साथीच्या रोगांनी अनेक रूग्णांचा बळी गेला. कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना या गावांमध्ये करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक गावात पुन्हा साथीचे रोग पसरले. जिल्हा परिषदेत साथरोग अधिकारी म्हणून डॉ. रविंद्र चौधरी हे काम पाहतात. साथरोग अधिकार्याला साथ येणार्या गावांमध्ये पूर्व नियोजन करण्याचे काम करावे लागते. अशा ठिकाणी आरोग्य यंत्रणेला सजग ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे असते. परंतु गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साथरोग अधिकार्यांकडे आरोग्य विभागातील औषधी भांडार, मानव विकास मिशन अंतर्गत समन्वय ठेवण्याचे काम तसेच जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या कामाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. हे साथ रोग अधिकारी गट ब चे अधिकारी असून त्यांच्याकडे जिल्हा प्रशिक्षण पथकाचे काम देता येत नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या ब वर्ग अधिकार्याकडे जिल्हा प्रशिक्षण पथकाचाही भार दिलेला आहे. त्यामुळे कामाच्या व्यापामुळे त्यांना साथीच्या रोगांवर जिल्हाभर नियंत्रण करणे शक्य होत नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी ही बाब लक्षात घेऊन त्यांच्याकडे केवळ साथरोग विभागाचाच पदभार ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त कामामुळे आरोग्य केंद्राच्या भेटीही बंद झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
साथरोग अधिकारी अन्य कामात व्यस्त
By admin | Published: May 18, 2014 11:34 PM