सिरोंचा ते आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या ४ महिन्यांपासून सुरू आहे. परंतु कामाच्या अंदाजपत्रकात कोणत्या प्रकारचे कामाचे स्वरूप आहे, यााबाबत स्पष्टता नाही. सुरू असलेल्या कामावर कार्यवाही अभियंता कनिष्ठ अभियंता व सहायक अभियंता कोणीही उपस्थित राहत नाही. कंत्राटदार कोणाच्या देखरेखीखाली काम करीत आहेत, याबाबतही माहिती नाही.
कंत्राटदार मनमानी काम करीत आहेत. सध्या सिरोंचा ते आसरअल्ली मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना माेठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु धुळीचा त्रास कमी करण्यासाठी संबंधित कंत्राटदार काहीच उपाययाेजना करीत नाही. या मार्गावरून छत्तीसगड, तेलंगणा व इतर राज्यातून जड वाहनांचे आवागमन रात्रंदिवस असते. सध्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा तपासून कारवाई करावी, अशी मागणी पं.स. सदस्य प्रभाकर शानगाेंडा यांच्यासह आरडा, लंबडपल्ली, पेंटिपाका येथील नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.