वैरागड : वातावरणातील बदलाचा परिणाम कडधान्य पिकांवरही हाेत आहे. जाेमात वाढत असलेल्या कडधान्य पिकांवर विविध राेगांचा प्रादुर्भाव हाेण्यास सुरुवात झाली आहे. त्यापैकी हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिक नष्ट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
विदर्भात कडधान्यांमध्ये तुरीच्या क्षेत्रानंतर हरभऱ्याचे लागवड क्षेत्र सर्वात माेठे आहे. सध्या हरभरा पीक फुलाेऱ्यावर आहे. त्यातच पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आरमाेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात सभा, भेटी व सूचनाफलकावर माहिती देऊन जागृती सुरू आहे. कृषी अधिकारी व कृषी सहायक प्रत्यक्ष बांधावर जाऊन हरभरा पिकाचे निरीक्षण करीत आहेत. वैरागड येथे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन किडीची पाहणी केली. तसेच शतकऱ्यांना सल्ला दिला. कीड आढळून आल्यास शेतकऱ्यांनी शेतात बांबूचे त्रिकाेणी पक्षी थांबे उभारावे. हेक्टरी २० पक्षी थांबे याप्रमाणात लावल्यास पक्षी त्या थांब्यांवर बसून किडी वेचून खातील. या माध्यमातून आपाेआपच घाटेअळीचा बंदाेबस्त हाेईल, असे आवाहन आरमाेरीचे तालुका कृषी अधिकारी टी. डी.ढगे यांनी केेले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी जी.एन. जाधवर, कृषी पर्यवेक्षक ए. आर.हुकरे, कृषी सहायक काेविंद मडकाम, ए.एल. केराम व शेतकरी उपस्थित हाेते.
बाॅक्स
रबी हंगामात वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव हाेताे. मादी पतंग शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर अंडी घालतात. त्यानंतर दाेन-तीन दिवसात अळी बाहेर पडते. अळ्या माेठ्या झाल्यावर काेवळी पूर्ण पाने देठासह फस्त करतात. किडींचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास केवळ देठ शिल्लक राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पक्षीथांबे लावावे तसेच सल्ल्यानुसार कीटकनाशक फवारणी करावी, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला.