कुरखेडा : मुक्तिपथतर्फे ''''दारूमुक्त निवडणूक'''' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता व कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी यांची नुकतीच बैठक पार पडली. तालुकाभरात ''''दारूमुक्त ग्रामपंचायत निवडणुक'''' होणे आवश्यक असून, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तालुक्यातील २० गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचे वाटप होऊ शकते. दारू वाटणे किंवा पाजणे हा निवडणुकीच्या नियंत्रणाचा भंग होईल. हा गुन्हा आहे. त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांतीपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी डॉ. गुप्ता यांनी तहसीलदारांशी चर्चा करून ''''दारूमुक्त निवडणुक'''' अभियानाची माहिती दिली.
ग्रामपंचायत निवडणूक ही पूर्णतः दारूमुक्त व्हावी, यासाठी गावागावांत ठराव घेऊन मागणी केली जात आहे. आतापर्यंत कुरखेडातील एकूण २० गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून गावागावांत ''''दारूमुक्त निवडणूक'''' संदर्भात जनजागृती केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा दारूचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांकडून ''''मी दारूचे वाटप करणार नाही'''' अशा आशयाचे संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत. स्थानिक प्रशासन व मुक्तिपथ संयुक्तरीत्या दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे, आदी महत्त्वपूर्ण बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.