गडचिरोली : कमलापूर हत्ती कॅम्प मधील काही हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथील प्राणी संग्रहालयात हलविण्याचे वनविभागाच्या (वन्यजीव) निर्णयाविरोधात गडचिरोली जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागातून ही विरोध होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे हे वनवैभव जिल्ह्यातच कायम राहावे यासाठी गडचिरोली प्रेस क्लबने ही पुढाकार घेऊन हे हत्ती कोणत्याही परिस्थितीत येथून हलवू नयेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संजय मिना व गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
या निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या राज्यात सर्वाधिक आठ हत्ती कमलापूर येथे आहेत. याठिकाणी हत्तींना पोषक वातावरण, मोकळे, जंगल, तलाव आहे. संग्रहालयात त्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करून मर्यादित हालचाल करत कृत्रिम अन्नावर जगण्यास भाग पाडण्यात येईल. याशिवाय या हत्तींना शोभेचे प्राणी बनवून त्यांच्या जिवावर प्राणी संग्रहालय पैसा कमवेल. वन्यजीवांचा असा खेळ करणे योग्य नसल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज ताजने, सचिव मिलिंद उमरे, उपाध्यक्ष प्रा. अनिल धामोडे, कोषाध्यक्ष नंदकिशोर काथवटे, सहसचिव निलेश पटले, ज्येष्ठ सदस्य रोहिदास राऊत, सुरेश पद्मशाली, अविनाश भांडेकर, अरविंदकुमार खोब्रागडे, सुरेश नगराळे, रूपराज वाकोडे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे आदी उपस्थित होते.
तेलंगणा-छत्तीसगडच्या पर्यटकांना ही आकर्षण
कमलापूर येथे हत्तींची योग्य निगा राखली जात आहे. शिवाय येथे महाराष्ट्र राज्यासह लगतच्या तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील पर्यटक ही हत्तींना बघण्यासाठी येतात. त्यामुळे येथील आदिवासीबहुल गोरगरीब नागरिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. शिवाय हत्तींना कोंडून ठेवण्यात येत नसल्याने त्यांना कुठलाही अपाय होताना दिसत नाही.