निवेदन दिले : रायुकाँच्या पदाधिकाऱ्यांची सिरोंचा तहसीलवर धडकसिरोंचा : सन २०१६-१७ या चालू वर्षात सिरोंचा तालुक्यातील रेती घाटामधून नियमबाह्य पोकलँड व इतर यंत्राद्वारे रेतीचे मोठ्या प्रमाणात खनन व वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. या मुद्यावर आक्रमक होत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट सिरोंचा तहसील कार्यालय गाठून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.रायुकाँचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश सडवली भोगे यांच्या नेतृत्वात सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सिरोंचाचे नगरसेवक राहू (बबलू) शेख, नरेश अलोणे, सरोजना मग्गीडी, संतोषी परसा, नागेश्वर गागापूरवार, राजेश बंदेला आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्यात चालू वर्षाकरिता १० रेती घाट लिलाव प्रक्रिया ठेवण्यात आले. यापैकी नऊ रेती घाटाची विक्री झाली असून वडधम, नगरम यासह इतर रेती घाटातून पोकलँड मशीनद्वारे रेतीचे नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणात खनन केले जात आहे. संबंधित लिलावधारकांनी हेतुपुरस्सर शासनाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित रेती कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
अवैध रेती खननाची चौकशी करा
By admin | Published: November 09, 2016 2:34 AM