वन कर्मचाऱ्यांची प्रशंसा : अप्पर प्रधान मुख्य संरक्षकांची रामपूरला भेटआलापल्ली : महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक के. एन. खावरी यांनी शनिवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान अहेरी तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या रामपूर बिटातील गावांना भेट देऊन वन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या खोदतळ्याच्या कामाची पाहणी केली.गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम नक्षलप्रभावित जिल्ह्यात वन विभागामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून अतिशय चांगल्या दर्जाची सिंचन सुविधेची कामे झालेली आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. अहेरी भागातील वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या कामाची अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक के. एन. खावरी यांनी प्रशंसा केली. याप्रसंगी आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, उपवनसंरक्षक के. डी. कोवे, उपविभागीय वनाधिकारी आर. एम. अग्रवाल, आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी नागुलवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी अहेरीचे प्रभारी क्षेत्र सहायक आर. एस. मडावी यांनी खोदतळ्याच्या कामाची प्रधान मुख्य वनसंरक्षक के. एन. खावरी व इतर उपस्थित वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्यातील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्वरित सिंचन सुविधेची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश खावरी यांनी दिले. (वार्ताहर)
खोदतळा कामाची केली पाहणी
By admin | Published: February 29, 2016 1:01 AM