गडचिरोली/ वर्धा : जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली. केंद्रीय पथकातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील दहा गावांत जाऊन केली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीसह शेतकरी, नुकसानग्रस्त व अधिकाऱ्यांशी संवाद साधून नुकसानीबाबतची अधिकचीही माहिती जाणून घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीच्या पुरामुळे बसलेल्या फटक्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी गडचिरोलीत दाखल झाले. तीन अधिकाऱ्यांच्या या पथकाने हेलिकॉप्टरने सिरोंचा येथे जाऊन काही शेतात पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या पथकात अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश आहे. पुरादरम्यान १० हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले होते. शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. तसेच सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या मार्गावरील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा पुरात वाहून गेली होती.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी श्री अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी आणि तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
पूरबाधित नागरिकांशी साधला संवाद
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातील नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील उपस्थित शेतकरी व नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीसह झालेल्या जनावरांच्या हानीबाबत माहिती दिली. शेताच्या बांधावर जाऊनही पथकातील सदस्यांनी पाहणी केली. याबाबतचा अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बोरगावच्या शेतकऱ्याने साधला इंग्रजी, हिंदी अन् मराठीत संवाद
विशेष म्हणजे देवळी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय अधिकाऱ्याप्रमाणेच सुरुवातीला इंग्रजी, नंतर हिंदी, तर नंतर मराठी भाषेत केंद्रीय पथकातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे ओढावलेली पूरस्थिती व नुकसानीची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा यांच्या नेतृत्वातील पथकात जलशक्ती मंत्रालयाचे संचालक गिरीश उंबरजे, ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिकचंद्र पंडित, ऊर्जा मंत्रालयाच्या सहायक संचालक मीना हुड्डा यांचा समावेश होता.
पथकासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, वर्धा येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांच्यासह सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट तसेच समुद्रपूरचे तहसीलदार आदींची उपस्थिती होती. हिंगणघाट येथील विश्रामगृहात भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली.