आरमाेरी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बुधवारी आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील साेईसुविधांची पाहणी केली व उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.
जानेवारी महिन्यात भंडारा येथील रुग्णालयात डाॅक्टर व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत बालकांचा मृत्यू झाला हाेता. जिल्ह्यात अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्वतः रुग्णालयात भेटी देऊन तेथे उपलब्ध असलेल्या सोईसुविधांचा आढावा घेत आहेत. आरमाेरी येथील रुग्णालयात असलेल्या बेडची व्यवस्था, उपलब्ध बेड, कोरोनाव्यवस्थेची माहिती, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी आदींची पाहणी करून उपलब्ध सेवेचा फायदा रुग्णांना मिळावा, अशा सूचना डाॅक्टरांना दिल्या. बाह्यरुग्ण सेवा, तपासणी कक्ष, लहान मुलांचे बेड, आरोग्याच्या सोई, औषधी साठा, रुग्णवाहिका, १०८ वाहन आदींची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षक डाॅ. छाया उईके यांच्याकडून जाणून घेतली. रुग्णांना सुविधांची कमतरता भासू नये, तसेच काही कमतरता असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. वाढीव बेडकरिता लागणाऱ्या इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षकांना दिली. तसेच नुकतेच उद्घाटन झालेल्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, पोलीस निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी, अभियंता प्रवीण झापे, डॉ. श्रीकांत कावळे, रुग्णालयातील डाॅक्टर, नर्सेस, कर्मचारी उपस्थित होते.