चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या विद्युत खांबाने अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.
आलापल्ली मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य
आष्टी : येथील आलापल्ली मार्गावर पेट्राेलपंपच्या पुढे रस्त्याच्या कडेला माेठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दुकानदार येथे कचरा टाकत असल्यामुळे डम्पींग यार्ड बनले आहे.
गाेकुलनगर रस्त्यांची दुरूस्ती करा
गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्यांची नगर परिषदेने दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणच्या नाल्या तुडूंब आहेत.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.