लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हितासाठी दारूबंदी कायम ठेवून दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, असे मत ज्येष्ष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. त्याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. यासोबतच ग्रामसभांचे मार्गदर्शक देवाजी तोफा यांनीही दारूबंदीचे समर्थन करत दारूबंदीची गरज कशी आहे हे स्पष्ट केले.
भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची उभारणी करून गेल्या चार दशकांपासून आदिवासींच्या सहवासात वास्तव्य करणाऱ्या डॉ.आमटे यांनी गडचिरोलीच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातीलही दारूबंदी उठवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.१९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर सीमेवरून अवैधरित्या दारू येणे बंद झाले. त्यामुळे चंद्रपूरमधील दारूबंदी कायम ठेवून तिथेही दारूमुक्तीचे अभियान शासनाने सुरू करावे, अशी मागणी डॉ.आमटे यांनी निवेदनातून केली आहे.
आदिवासी समाजात सण व उत्सवाच्याप्रसंगी दारू पिण्याची प्रथा आहे. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने कमी प्रमाणात दारू काढली जाते. त्यामुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. गावातील महिला संघटना दारूमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे दारूबंदी कायम ठेवण्याची गरज आहे, असे मत समाजसेवक देवाजी तोफा यांनी व्यक्त केले आहे. दारूबंदी कायम ठेवण्याचे निवेदन मेंढा (लेखा) येथील ग्रामसभेने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.