लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : संपूर्ण जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदी अद्यापही पूर्णपणे सुरू झाली नाही. काही केंद्रांवर १ जूनपासून रबी हंगामातील धान खरेदी करणार, अशी घोषणा शासनाने केली असली, तरी मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने रबी खरेदीचा धान कुठे ठेवायचा? असा प्रश्न आहे. रबीचा धान उघड्यावर खरेदी केल्यास त्याला अभिकर्ता संस्था जबाबदार राहील, असे पत्र आदिवासी संस्थांना उपप्रादेशिक व्यवस्थापकांकडून प्राप्त झाल्याने अनेक संस्था व्यवस्थापक रबी धान खरेदी तयार नाही. त्यामुळे धान साठवणुकीचा तिढा कायम आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडून खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सुटल्याने रबीतील खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु अजूनपर्यंत खरिपातील धानाची उचल झाली नाही. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, वडेगाव, दवंडी, वैरागड आदी केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्थानी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गोदाम पूर्ण भरल्याने काही माल उघड्यावर आहे. हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. या वर्षात महामंडळाने ताडपत्रीदेखील पुरविली नाही. अशा स्थितीत खरेदी कशी करायची, असा प्रश्न संपूर्ण संस्थांसमोर निर्माण झाला आहे.रबी हंगामातील धान खरेदीसंदर्भात काही निवडक संस्थांना पत्र आल्यानंतर काही दिवसांतच उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी संस्थांना पत्र दिल्याने संस्थांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळेस काही निवडक संस्थांमध्ये रबीची खरेदी होणार असून शेतकऱ्यांना विक्रीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी माल विकणार कुठे?काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात हाेणार आहे. अधीच शेतकऱ्यांकडे रबी हंगामातील धान साठवून ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे रबीतील धान विक्री करणे आवश्यक आहे. सध्या खासगी व्यापारी कवडीमाेल भावाने धानाची खरेदी करीत आहेत; परंतु यात शेतकऱ्यांना बराच ताेटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकरी धान विक्रीची लगबग करीत आहेत. यासाठी वारंवार ते खरेदी केंद्रावर हेलपाटे मारत असून शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्यास माल विकणार कुठे? असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत.
उन्हाळी धानपीक विक्रीची शेतकऱ्यांना लगबगउन्हाळी धानपीक निघाले असून हे धान विक्री करून त्यातूनच खरीपासाठी खते, बियाणे खरेदी करायची आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी लगबग सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्यास आणखी काही दिवसांचा विलंब झाल्यास शेतकरी धान खासगी व्यापाऱ्याला विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे धान कुठे ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर धानाची वाहतूक करण्यासही अडचण निर्माण हाेणार आहे.