गडचिरोली : लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच जेवणाचे अन्य कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली जात नाही. परंतु आता राज्यात हे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निर्देश दिले आहेत.
गडचिरोली येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी आत्राम बोलत होते. अनेकदा जेवणातून विषबाधा होते. यामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो. काही दिवसांपूर्वी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानभवन परिसरातील उपाहारगृहातील अस्वच्छतेबद्दल भाष्य करून त्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगीची अट घातली होती.
विषबाधेबाबतचा धोका टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने निर्णय घेतला आहे. लग्नसमारंभ असो की वाढदिवस ज्या ठिकाणी जेवणाचे मोठे आयोजित केले जातात. यापुढे त्यांनादेखील अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे मंत्री आत्राम म्हणाले.