२०१५-१६ मधील मदत : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रक्कम प्राप्तगडचिरोली : २०१५-१६ या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाली असून सदर रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. जिल्हाभरातील १ हजार ८४२ विमा सभासद असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.अतिवृष्टी, दुष्काळ, आग, रोग आदींसारख्या दुर्घटनांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडतोे. कधीकधी दुष्काळामुळे उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला थोडीफार आर्थिक मदत मिळावी, यासाठी पिकांचा विमा काढला जातो. शेतकरीवर्गाला नाममात्र रक्कम जमा करावी लागते. २०१५-१६ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधून २ हजार ८७२ शेतकऱ्यांनी ३ हजार ७३४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. विमा कंपनीकडे १६ लाख २० हजार ३८२ रूपये विमा हप्ता म्हणून जमा केला होता. सुमारे ५ कोटी ७५ लाख ४३ हजार ३८५ रूपयांचा विमा काढला होता. मागील वर्षी जिल्हाभर दुष्काळाचे सावट होते. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची रोवणीच केली नाही. त्यामुळे शेती मशागतीचा खर्च वाया गेला. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली, त्यांचेही धानपीक करपून गेले होते. त्यामुळे पीक विम्याची रक्कम मिळणार, अशी आशा शेतकरीवर्ग बाळगून होता. अधिकारीवर्गाकडून संपूर्ण शेतीचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर सात तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लागू केला आहे. १ हजार ८४२ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विमा कंपनीकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला १ कोटी १६ लाख ७८ हजार ९३२ रूपये एवढी विमा रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्या-त्या शाखेमधून जमा केली जाणार आहे. खरीप हंगामाच्या मशागतीपूर्वी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाल्याने खरीप हंगामाचा थोडाफार खर्च उचलण्यास मदत झाली आहे. दुष्काळ परिस्थितीत विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. (नगर प्रतिनिधी)पीक विमा सक्तीचा होणारयापूर्वी पीक विमा काढणे शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीक विमा काढण्यास तयार होत नव्हते. जे शेतकरी बँकांकडून कर्ज घेत होते, ते शेतकरी पीक विमा काढत होते. इतर शेतकरी मात्र पीक विमा काढण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नेहमीच कमी राहत होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागील वर्षी केवळ २ हजार ८७२ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गडचिरोली जिल्ह्यात एकूण जवळपास ५० हजार शेतकरी आहेत. त्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. खरीप हंगामासाठी लाभदायकपीक विम्याची रक्कम अगदी खरीप हंगामाच्या सुरुवातीला प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीचे कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर खते, बी-बियाणे खरेदीचीही लगबग सुरू केली आहे. पैशाची नित्तांतन गरज शेतकरीवर्गाला होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झाला आहे. या माध्यमातून खरीप हंगामाचा थोडाफार खर्च पीक विम्याच्या रकमेतून करण्यास मदत होणार आहे.
१,८४२ शेतकऱ्यांना विमा मंजूर
By admin | Published: June 03, 2016 1:13 AM