गडचिराेली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वेतन हाेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बँकेने सॅलरी पॅकेजअंतर्गत ३० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा काढला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला बँकेमार्फत विम्याची रक्कम प्रदान करण्यात आली.
नवेगाव येथील संजीवनी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक देवेंद्र माराेतराव किरमीरवार यांचा जानेवारी २०२१ मध्ये अपघाती निधन झाले. तसेच मक्केपल्ली येथील साईनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक नकटू सदाशिव टेकाम यांचे फेब्रुवारी २०२० मध्ये अपघाती निधन झाले. बँकेने विमा कंपनीसाेबत वैयक्तिक अपघात विम्याबाबतचा करार केला आहे. त्यानुसार देवेंद्र माराेतराव किरमिरवार यांचा ३० लाख रुपये व नकटू सदाशिव टेकाम यांचा १७ लाख रुपयांचा दावा मंजूर केला. धनादेशाचे वितरण बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, व्यवस्थापक टी.डब्ल्यू. भुरसे, उपव्यवस्थापक के. एस. साखरे, विकास अधिकारी के. के. सांबरे उपस्थित हाेते.
३० लाखांचा धनादेश सपना देवेंद्र किरमिरवार व १७ लाखांचा धनादेश कालिंदा नकटू टेकाम यांना देण्यात आला.