गरिबांची पसंती : प्रधानमंत्री सुरक्षा विमा व जीवन ज्योती योजनागडचिरोली : अपघातांचे वाढलेले प्रमाण, बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली विमा योजनांविषयी जनजागृती व विमाधारकांच्या नातेवाईकांना मिळालेली मदत यामुळे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला नागरिकांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. मागील नऊ महिन्यात या दोन्ही योजनाअंतर्गत जिल्हाभरातील सुमारे ४८ हजार ७२१ नागरिकांनी विमा काढला आहे. विमा योजनांमध्ये असलेला नफा लक्षात घेऊन अनेक खासगी कंपन्या विम्याचे वेगवेगळे प्लॅन घेऊन समोर आल्या आहेत. मात्र या कंपन्यांच्या विम्याचे हप्ते गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे गरीब नागरिक खासगी कंपन्यांकडून विमा काढू शकत नाही. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. सर्वसामान्य नागरिकाला विम्याचे संरक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने जून २०१५ मध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केल्या. प्रधानमंत्री सुरक्षा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना वर्षाचे केवळ १२ रूपये भरून विम्याचे संरक्षण दिले जाते. यामध्ये केवळ अपघाती निधन झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयाला मदत दिली जाते. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत वर्षाचे ३३० रूपये शुल्क भरावा लागतो. सदर योजना १८ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी लागू आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला दोन लाख रूपयांची मदत दिली जाते. शासनाच्या या दोन्ही योजनांना गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. ९ महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत सुमारे ३४ हजार १६८ नागरिकांनी विमा काढला आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरक्षा योजनेंतर्गत १४ हजार ५५३ नागरिकांनी विम्याचा लाभ घेतला आहे. दुर्गम भागातील काही गावांमधील नागरिकांमध्ये अजुनही या योजनांविषयी पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. यासाठी प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)विम्यामुळे जनधनच्या खात्यांमध्ये भरदोन्ही प्रकारचा विमा बँकेच्या मार्फतीनेच काढला जातो. विम्याच्या हप्त्याची रक्कम बँक खात्यातून वजा केली जात असल्याने विमा काढण्यासाठी बँक खाते आवश्यक आहे. त्यामुळे जे नागरिक विमा काढण्यासाठी बँकेत येतात, त्यांचा जनधन योजनेंतर्गत विमा काढला जातो. या योजनांमुळे जनधन योजनेचे खाते वाढण्यास मदत झाली आहे. विशेष करून एटापल्ली, भामरागड, धानोरा, सिरोंचा या आदिवासीबहुल नागरिकांचे खाते नव्हते. मात्र या योजनेमुळे खाते निघाले आहे. त्यामुळे जनधनचे खाते वाढले आहेत.
नागरिकांना विम्याचे कवच
By admin | Published: March 18, 2016 1:25 AM