गडचिरोली : जिल्हा परिषदेत सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शंकर कोरंटलावार यांनी वेगवेगळ्या प्रवर्गातून पदोन्नतीचा लाभ घेतला असल्याने या प्र्रकरणाची सखोल चौकशी करून कोरंटलावार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जि. प. सदस्य अशोक इंदूरकर यांनी जि. प. अध्यक्षा यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. शंकर कोरंटलावार यांची धानोरा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपीक या पदावर अनुसूचित जमातीमधून निवड झाली. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक या पदाची पदोन्नती अनुसूचित जमाती या प्रवर्गातूनच घेतली. त्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी या पदाच्या पदोन्नतीसाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जोडले. कोरंटलावार यांनी अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात सादर केले आहे. कोरंटलावार यांनी प्रशासनाची दिशाभूल करीत दोन जातीमधून पदोन्नतीचा तीन वेळा नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतला आहे. एकाच कर्मचाऱ्याने वेगवेगळ्या प्रवर्गातून पदोन्नतीचा लाभ घेणे हे नियमबाह्य व घटनाबाह्य आहे. कोरंटलावार यांना १२ आॅगस्ट २००५ रोजी सहाय्यक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र ते लेखा व वित्तसेवा वर्ग ३ ची परीक्षा पास झाले नसल्याने त्यांची नियुक्ती अस्थायी स्वरूपात करण्यात आली होती. त्याचबरोबर सदर परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक होते. विहित कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास व त्या कालावधीत दुसरा पात्र कर्मचारी उपलब्ध झाल्यास पदावनती करण्याचीसुद्धा तरतूद आहे. २००९ साली डी. एन. सहारे हे लेखा व वित्तसेवा वर्ग ३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे पात्र कर्मचारी प्राप्त झाल्यानंतर कोरंटलावार यांची पदावनती करणे आवश्यक होते. मात्र असे न करता कोरंटलावार यांना त्याच पदावर ठेवण्यात आले. कोरंटलावार हे वयाचे ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना लेखा व वित्तसेवा वर्गाच्या परीक्षेतून सूट देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी सहारे यांनी त्यापूर्वीच लेखा व वित्तसेवा परीक्षा पास केली होती. त्यामुळे त्याच कालावधीत त्यांना पदोन्नती देणे आवश्यक असतांनाही पदोन्नती देण्यात आली नाही. हे सर्व नियमबाह्य काम होण्यासाठी कोरंटलावार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळत आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याने त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
कोरंटलावार यांची चौकशी करा
By admin | Published: June 16, 2014 11:30 PM