गडचिरोली : कोरोना विषाणू संसर्गामुळे येथील गोंडवाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची भरती लांबणीवर पडली होती. तीन वर्षांनंतर ही भरती प्रक्रिया नव्याने राबविण्यात आली. मात्र, तत्कालीन व्यवस्थापन समितीने निवडलेल्या तीन विषय तज्ज्ञांना हटवून नवे विषयतज्ज्ञ नेमले होते. 'लोकमत'ने २१ जून रोजी वृत्त प्रकाशित केल्यावर विद्यापीठाने अधिसूचना जारी करून मुलाखती तात्पुरत्या स्थगित केल्याचे स्पष्ट केले ,परंतु यासाठी राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीचे कारण दिले आहे.
विषयतज्ज्ञांची वैधता संपुष्टात आली कशी?
गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी २४ ते ३० जूनदरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. मात्र, तत्कालीन व्यवस्थापन समितीने निवडलेल्या तीन विषयतज्ज्ञांना डच्चू देत नवीन विषयतज्ज्ञ निवडले होते. पहिली भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना व विषयतज्ज्ञांची नावे कुलगुरुंकडे लिफाफाबंद असताना विषयतज्ज्ञांची वैधता संपुष्टात आली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे मुलाखती वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक भरती, जुन्या निवड समितीतील विषय तज्ज्ञांना डच्चू
दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मात्र नवे विषयतज्ज्ञ निवडण्यापूर्वी राज्यपालांची रितसर परवानगी घेतल्याचा दावा केला. 'लोकमत'ने २१ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यावर अखेर विद्यापीठाचे अधिष्ठाता व निवड समितीचे सदस्य सचिव डॉ. अनिल चिताडे व डॉ. ए. एस. चंद्रमौळी यांनी सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ५ जुलै रोजी गडचिरोली दौऱ्यावर आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे शालीन्यास व दीक्षांत समारोह राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे, त्यामुळे मुलाखती स्थगित केल्या जात असल्याचे कारण दिले आहे.
सुटीच्या दिवशीही मुलाखतींचा घातला होता घाट
गोंडवाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांच्या मुलाखतींसाठी पात्र उमेदवारांना बोलावण्यात आले होते. २४ ते ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया होती. या दरम्यान, २५ जूनला रविवारी व २९ जून रोजी बकरी ईदला शासकीय सुटी असतानाही मुलाखती घेण्याचा घाट घातला होता. 'लोकमत'ने याकडे लक्ष वेधले होते, त्यानंतर अखेर मुलाखती स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.