सागवानची तस्करी : वन विभागाचे दुर्लक्षजोगीसाखरा : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या सावलखेडा बिटामधील सागवान रोपवनातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आरमोरी वन परिक्षेत्राच्या सावलखेडा बिटातील कक्ष क्रमांक ३० व ३१ येथील दोनशे ते अडीचशे हेक्टरवरील रोपवनात ६० ते ७५ सेमी गोलाई व १५ ते २० मीटर उंची असलेले अतिशय मौल्यवान व महागडे सागवान झाडे तोडीमुळे नष्ट होत आहे. संबंधित वनरक्षकाशी संपर्क साधून अवैध सागवान वृक्षतोड करून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. मात्र याबाबत संबंधित वनरक्षक व वनपाल गप्प का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल देणाऱ्या सागवान रोपवनाला वाऱ्यावर सोडून नवीन रोपवन तयार करण्याच्या कामातून अधिक पैसा जमविण्याच्या कामात वनाधिकारी व्यस्त असल्याचे दिसून येते. संबंधित बिट वनरक्षकाने काही खुटावर हतोडा मारला. मात्र रिक्वरीच्या भितीने उर्वरित माल जमा केलेला नाही. त्यापुढील कार्यवाहीकडे संबंधित वनरक्षकाने पूर्णत: दुर्लक्ष केले. सावलखेडा बिटातील जंगल क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणाची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी सावलखेडा गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
सावलखेडा बिटात अवैध वृक्षतोड
By admin | Published: May 09, 2016 1:21 AM