कोर्टात याचिका दाखल : सुरेश बारसागडे यांची माहितीगडचिरोली : सूरजागड लोह प्रकल्प उत्खननाचे काम जनतेला विश्वासात घेऊन करण्यात आले नाही. तसेच कंपनीच्या वतीने प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. लोह दगड उत्खननादरम्यान ७ हेक्टर आर वरील सागवान व बांबूंची झाडे तोडण्यात आली. सदर प्रकल्पाच्या लीज प्रक्रियेबाबत न्यायालयीन चौकशी करून जनतेला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २९ एप्रिल रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सुरेश बारसागडे म्हणाले, कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता शासनाने लायल्ड कंपनीला लोह दगड उत्खननाची लीज दिली. या प्रक्रियेच्या जनसुनावणीची माहिती नागरिकांना स्थानिक भाषेत देण्यात आली नाही. तसेच ग्रामसभेच्या सहमतीसह ठराव घेण्यात आला नाही. सदर प्रकल्पाचे काम जनतेच्या हितासाठी होण्याकरिता या प्रकल्पाच्या लीज प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी बारसागडे यांनी केली. यावेळी सरिता पुंगाटी, दीक्षा बारसागडे, कुणाल करमरकर हजर होते.
सूरजागड प्रकल्पाच्या लीज प्रक्रियेची चौकशी करा
By admin | Published: June 03, 2016 1:15 AM