धानोरा : शहरातील पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे ट्रेलर व ट्रक बराच वेळ उभे राहतात. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना त्रास होताे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
धानोरा-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर नेहमीच चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ असते. पेट्रोेपलंपाजवळ महाविद्यालय व हायस्कूल आहे. वजनदार साहित्य घेऊन अनेक ट्रेलर या मार्गाने आवागमन करतात. मात्र, रस्त्याच्या दोन्ही कडेला ट्रक उभे राहत असल्याने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसतो. अत्यल्प वेळासाठी शहरातून जाणाऱ्या या मुख्य मार्गावर ट्रक उभी केली जात नाही. रस्त्यावर बराच वेळ ट्रक उभे राहत असल्याने येथे वाहतुकीची काेंडी हाेते. अनेकदा वाहतूक विस्कळीत हाेते. यासंदर्भात बऱ्याच नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या हाेत्या. मात्र, कारवाई झाली नाही. या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी ठेवू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.