या जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. तेंदुपत्ता हंगाम हा काही दिवसांपुरता मर्यादित असतो. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. रोजगार नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना सुरजागड लोहप्रकल्पामुळे रोजगाराची संधी चालून आली आहे. लॉयड्स मेटल्सने कोनसरी येथील लोहप्रकल्प लवकरात लवकर उभारावा आणि त्यात स्थानिक लोकांनाच रोजगाराची संधी द्यावी, अशी अपेक्षा धर्मरावबाबांनी व्यक्त केली.
पत्रपरिषदेला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, श्रीनिवास गोडशेलवार, लीलाधर भरडकर, सुरेंद्र अलोने आदी राकाँचे पदाधिकारी उपस्थित होते.
(बॉक्स)
राज्य सरकारला मोठा महसूल
सुरजागड लोहखाणीतून जवळपास ३० लाख मे.टन लोहदगड काढले जाईल. त्यापैकी ५ लाख मे.टन घुग्गुसच्या कारखान्यात जाईल, तर उर्वरित २५ लाख मे.टन कोनसरीसह इतर ठिकाणच्या लोहप्रकल्पांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी जाईल. यातून राज्य सरकारला वार्षिक ५१६ कोटी रुपयांचा महसूल आणि १६० कोटींची रॉयल्टी मिळेल. याशिवाय कंपनीच्या सीएसआर फंडातून एटापल्ली, अहेरी तालुक्यात मोठी विकासात्मक कामे होतील, असा विश्वास धर्मरावबाबांनी व्यक्त केला.
(बॉक्स)
ओरिसातील आदिवासींचा आर्थिक उदय, मग माझ्या जिल्ह्यात का नाही?
यावेळी धर्मरावबाबा म्हणाले, ज्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीला लॉयड्स मेटल्सने हा कंत्राट दिला. त्या कंपनीकडे ओरिसात सुरजागडसारख्या ११ खाणींचे काम आहे. त्या सर्व खाणी आदिवासी भागात आहेत. आज तेथील सर्व आदिवासींच्या झोपड्यांचे रूपांतर स्लॅबच्या घरात झाले. त्यांच्याकडे गाड्या-घोड्या येऊन आर्थिक उदय झाला. मग माझ्या जिल्ह्यातील आदिवासींनी तसेच राहायचे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
(बॉक्स)
आदिवासींचे दैवत नष्ट होणार हा अपप्रचार
लोहखाणीमुळे सुरजागड पहाडावरील आदिवासींचे दैवत, परंपरा, संस्कृती नष्ट होईल, असा अपप्रचार काही लोकांनी सुरू केला; पण तसे काहीही होणार नाही. लोहखाणीसाठी दिलेली जागा पूजास्थळापासून बरीच दूर आहे. मीसुद्धा आदिवासी असून माझ्यासाठीही ते श्रद्धास्थान आहे. माझे श्रद्धास्थान उद्ध्वस्त होणार असते तर मी स्वस्थ बसलो नसतो, असेही धर्मरावबाबांनी
यावेळी स्पष्ट केले. युवकांच्या हाताला काम मिळाल्यास आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊन संस्कृती, परंपरा टिकविण्यास अजून वाव मिळेल, असे ते म्हणाले.