नाना पटोले यांची माहिती : प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारूकुरखेडा : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच झाला पाहिजे, यासाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. सुरजागड लोहपहाडीवरून एकही लोहदगड गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच व्हावा या मागणीला घेऊन प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन उभारणार, अशी माहिती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांनी कुरखेडा येथे शासकीय विश्रामगृहात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.सदर पत्रकार परिषदेत खासदार नाना पटोले यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध ज्वलंत प्रश्नावर परखडपणे भूमिका मांडली. गडचिरोली जिल्ह्यात लागू झालेला पेसा कायदा, कमी झालेले ओबीसींचे आरक्षण, महामंडळामार्फत होणाऱ्या धान खरेदीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पेसा कायदा हा आघाडी सरकारचे पाप आहे. सदर कायद्यात आदिवासी तसेच गैरआदिवासींच्या हितसंबंधांना बाधा पोहोचणार नाही, अशा प्रकारची सूचना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाशिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही व तशी शक्यताही नाही. त्यामुळे ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी आपला शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सुध्दा सकारात्मक भूमिका घेऊन आहेत, असे खासदार नाना पटोले यांनी यावेळी सांगितली. पत्रकार परिषदेला आ. क्रिष्णा गजबे, प्रकाश पोरेड्डीवार, सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्र मोहबंशी उपस्थित होते.
लोहप्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही
By admin | Published: November 09, 2016 2:28 AM