आरमोरी : आरमोरी वीज वितरण केंद्रांतर्गत जोगीसाखरा येथील फिडरवरून आजूबाजूच्या ५ गावांमध्ये वीजपुरवठा केला जाताे. एरवी वीजपुरवठा नियमित राहत असला तरी, गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्राहकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तुरळक पाऊस पडत असल्याने शेतीला कृषिपंपाद्वारे पाणीपुरवठा करावा लागताे; परंतु वीजच नियमित राहत नसल्याने अडचणी येत आहेत.
आरमोरी तालुक्यात जोगीसाखरा हे विस्ताराने मोठे गाव आहे. गावालगत आणखी काही माेठी गावे आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जोगीसाखरा फिडरवरून पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, रामपूर व पालोरा आदी गावांमध्ये खंडित वीजपुरवठा केला जात आहे. पोळ्यासारख्या शेतकऱ्यांच्या सणालासुद्धा तीन रात्र वीजपुरवठा खंडित हाेता. सध्या दिवसभर वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. त्यामुळे अनेकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या आहेत. रात्रभर वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांना डासांपासून त्रास सहन करावा लागत आहे. डासांपासून नागरिकांना हिवताप, डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागात नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी ५ गावांतील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
मेंटनन्सचे काम याेग्य की थातुरमातुर?
विद्युत वितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यामध्ये दुरुस्ती व मेंटनन्सची कामे माेठ्या प्रमाणात केली जातात. यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून बराच निधीसुद्धा दिला जातो; परंतु संबंधित अभियंत्यांकडून याेग्य प्रकारचे काम होत नाही, थातुरमातुर कामे करून पैसे हडपले जातात. याचाच परिणाम म्हणून जराशी हवा आली किंवा थोडाफार पाऊस आला तरी स्पार्किंग हाेऊन संपूर्ण वीज एक-दोन दिवसांसाठी खंडित राहते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी केली जाणारी मेंटनन्सची कामे याेग्य प्रकारे केली जातात की थातुरमातुर, असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.
बाॅक्स
कामचुकार विद्युत अभियंत्यांवर कारवाई करा
जाेगीसाखरा भागात आठ दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी व पीक पाहणीकरिता शेतात जावे लागते, तसेच गावातून फिरताना रात्री साप, विंचू व अन्य सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाेगीसाखरा फिडरवरून पळसगाव, पाथरगोटा, जोगीसाखरा, शंकरनगर, रामपूर व पालोरा आदी गावांत हाेणाऱ्या खंडित व अनियमित वीजपुरवठ्यासाठी जबाबदार काेण? याची चाैकशी करून कर्तव्यात हयगय करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री तथा नगरपरिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती भारत बावणथडे यांनी केली आहे.