पळसगाव परिसर : शेकडो एकरातील उन्हाळी धान पीक संकटात आरमोरी : तालुक्यातील पळसगाव परिसरात गाढवी नदीलगत असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. जवळपास २०० एकर जमिनीवर उन्हाळी धानपीक आहे. सध्या धानपिकाला वेळोवेळी पाण्याची गरज आहे. परंतु मागील दहा दिवसांपासून परिसरात अनियमित वीज पुरवठा होत असल्याने धानपीक संकटात सापडले आहे. पळसगाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. कृषिपंपाच्या माध्यमातून पिकाला पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे या भागात मागील १० दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे धानपिकाला वेळेवर पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. या परिसरात दरवर्षी शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी दुबार पिकाची लागवड केली आहे. गाढवी नदीच्या पाण्यावर तसेच विहिरीवर कृषिपंप लावण्यात आले आहेत. परंतु विजेच्याअभावी शेतीला वेळेवर पाणी देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून वीज वितरण कंपनीने तत्काळ दखल घेऊन नियमित वीज पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम, सरपंच देवनाथ झलके, शेतकरी बाबुराव मने, दिगांबर चहांदे, अनिल वैद्य, श्रीराम सेलोकर, राजकुमार गरफडे, प्रकाश सेलोकर, श्यामराव सेलोकर, संतोष कांबळे, मच्छिंद्र मेश्राम, कार्तिक मातेरे, शालिक वैद्य, दोडकू बनकर, भाऊराव उरकुडे, मनोहर गेडाम, रमाकांत ढोंगे, युवराज धोडरे, भाग्यवान वैद्य, यादव सपाटे, मुखरू तितीरमारे, सदानंद नखाते, हिरालाल ढोरे, गणेश गरफडे, भेंडेश्वर अंबादे, देवा मेश्राम, विस्तारी लिंगायत, गोपी उरकुडे, प्रमोद मने व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) पाण्याअभावी पडल्या भेगा पळसगाव परिसरात गाढवी नदी परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धानपिकाच्या बांध्यांमध्ये पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. या कालावधीत धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज असताना विजेच्या लपंडावामुळे वेळेवर पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उन्हामुळे धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दहा दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा
By admin | Published: April 20, 2017 2:14 AM