तीव्र आंदोलन करण्याचा कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांचा इशारा(फोटो)
आरमोरी : येथील बर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळयोजनेचे पाणी नियमित येत नसल्याने पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी व कुणाल भरणे यांनी दिला आहे.
आरमोरी नगरपरिषदचे योग्य नियोजन नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बर्डी परिसरातील नागरिकांना बसत आहेत. बर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक दिवसआड येणारे पाणी आता तीन चार दिवसापर्यंत सोडले जात नाही. नळाद्वारे केवळ १५ ते २० मिनिटेच पाणीपुरवठा केला जाताे. नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बर्डी परिसरातील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा कोरोनाच्या काळात पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशारा काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी व कुणाल भरणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
बाॅक्स
प्रस्तावित नळयाेजना प्रस्ताव धूळखात
आरमाेरी येथील तत्कालीन नगरपंचायतने २०१४ पासून प्रस्तावित केलेली वाढीव नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न केल्यामुळे अजूनही सदर याेजनेचा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे. त्याची अंमलबजावणी झाली असती तर आरमोरीवासीयांना मुबलक पाणीपुरवठा झाला असता. परंतु आरमोरी शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना अंमलात आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाचे प्रयत्न करणे गरजेचे होते, मात्र ढिसाळ प्रशासन व नियोजनशून्य कारभारामुळेच शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
बाॅक्स
काही हातपंप नादुरुस्त तर काही काेरडे
बर्डी परिसरातील काही वाॅर्डात हातपंप असूनही गेल्या अनेक महिन्यांपासून ते नादुरुस्त आहेत. काही हातपंप सुरू असले तरी त्यांना पाणी येत नसल्याने तेही निरुपयोगी ठरत आहेत. काही दिवसांपासून पाणी टंचाईची गंभीर स्थिती बर्डी परिसरातील निर्माण झाली असतानाही नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बर्डी परिसरात नागरिकांमध्ये तीव्र राेष आहे.