गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला विहीर’ योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्यानुसार एका शेतकºयाने आपल्या शेतात बांधलेल्या सिंचन विहीरीचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी ८ हजारांची लाच घेणा-या देसाईगंज येथील शाखा अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. हरी आत्माराम गोन्नाडे असे त्या अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सिंचन विहीर योजनेनुसार शेतकºयांना विहीर बांधकामासाठी अनुदान दिले जाते. शेतकºयाने आधी स्वत: खर्च लावून विहीर बांधायची आणि नंतर त्याचे बिल सादर करायचे असते. त्यानुसार जिल्हा परिषद सिंचन विभागाचे देसाईगंज येथील शाखा अभियंता हरी गोन्नाडे यांच्या कार्यालयात तक्रारकर्त्या शेतकºयाने विहिरीचे बिल सादर केले. मात्र ते बिल मंजूर करण्यासाठी त्याला ८ हजार रुपयांची मागणी झाली. या शेतकºयाने गडचिरोलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार सादर केली. त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. त्यात ८ हजार रुपये लाचेची मागणी करून ती साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना अभियंता गोन्नाडेला रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई देसाईगंज येथील जि.प.सिंचन उपविभाग कार्यालयात सोमवारी दुपारी करण्यात आली.एसीबीचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पो.निरीक्षक एम.एस.टेकाम, सहा.फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार सत्यम लोहंबरे, ना.पो.शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, महेश कुकुडवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.
सिंचन विभागाच्या अभियंत्याने घेतली आठ हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 6:36 PM