घोट : चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी (बी) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेने वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त शाळा म्हणून दर्जा मिळवला आहे. संपूर्ण शाळेला आकर्षक करणारी डिजिटल रंगरंगोटी, शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज इमारत आणि प्रसन्न वातावरण यामुळे ही आश्रमशाळा सर्वासाठी एक आकर्षण ठरत आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील या आश्रमशाळेत सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. एवढेच नाही तर आधुनिक डिजिटल रंगरंगोटीही आहे. त्यामुळे दुरूनच ही शाळा लक्ष वेधून घेते. शासकीय आश्रमशाळा म्हटले की एक नकारात्मक चित्र डोळ्यासमोर येते. हे चित्र बदलण्याचा संकल्प शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदांनी केला आणि अवघ्या दोन वर्षात हे चित्र बरेच बदलून गेले.
मागील सत्रापासून शाळेत आमूलाग्र बदल होत गेले. शाळेतील सोयीसुविधांबाबत व रंगरंगोटीसाठी मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी पुढाकार घेतला. त्याला शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याशिवाय मार्गदर्शक म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी गडचिरोली आशिष येरेकर (आयएएस) तसेच सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) चंदा मगर, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) अनिल सोमणकर यांचे सहकार्य लाभल्याचे मुख्याध्यापिका महल्ले यांनी सांगितले.
याशिवाय शाळेचे पुरुष अधीक्षक डी.जी. चोपडे, महिला अधीक्षक हारीता बारसागडे, शिक्षक एस.डी. गोट्टमवार, ए.एस. खेवले, एल.डी. सोनवाने, एम.टी. उराडे., आर.एम.पेंद्राम, एस.एन. कन्नाके, व्ही.वाय.जुवारे, स्वयंपाकी जी.जी.आलाम, आर.एम. जाधव, टी.बी. शेंडे, कामाठी आय.के. गेडाम, के.एस. लोणारे, एम.डी. चापले, एस.डब्लु. बारसागडे, आर.डी. चौधरी, चौकीदार जी.एम. दुर्कीवार यांनी शाळेच्या आयएसओ मानांकनासाठी आपापले काम चोखपणे बजावले. हा दर्जा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अशा आहेत शाळेतील सोयीसुविधा
- या आश्रमशाळेत वाहनतळ, सुरक्षा रक्षक कुटी, डिश वॉश स्टेशन विथ डिश रॅक, हॅन्ड वॉश स्टेशन, वाचनालय, संगणक कक्ष, व्यायाम शाळा, ग्रीन जिम, अद्ययावत क्रीडा साहित्य, संपूर्ण स्टेशनरी, स्वतंत्र कार्यानुभव व कला दालन, सर्व वर्गखोल्या यांना डिजिटल पेंटिंग, फुल झाडांकरीता कॅरी, रोपवाटिका, पळसबाग, चप्पल स्टँड, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहुउदेशीय रंगमंच, आदिवासी विकास विभागाच्या योजनांचे माहिती दर्शविणारे फलक लावलेले आहे.
- प्रवेशव्दाराजवळ व्यसनमुक्तीवरील जनजागृतीपर माहिती, थोर महापुरूषांचे फोटो, अद्ययावत रेकॉर्ड, विविध फुलझाडे, अंतर्गत रस्ते व दिशादर्शक फलक, इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रमांसह ‘ध्यास गुणवत्तेचा, प्रगत आश्रमशाळेचा’ हे ब्रीद या शाळेने अंगिकारले. त्यामुळे हा बहुमान मिळाल्याचे मुख्याध्यापिका सांगतात. त्यासाठी सल्लागार म्हणून अनिल येवले यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.