गडचिरोली : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्मितीस राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न जोर धरू लागला असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडेही जिल्हा निर्मितीची मागणी रेटून धरली आहे.गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर-दक्षिण विस्तार जवळपास ३५० किमी आहे. भामरागड व सिरोंचा हे तालुके गडचिरोली मुख्यालयापासून सुमारे २५० किमी अंतरावर आहेत. जिल्हास्थळी एखाद्या प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकाला त्याच दिवशी परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. एक दिवस येण्यासाठी, दुसरा दिवस प्रशासकीय काम करण्यासाठी व तिसरा दिवस परत जाण्यासाठी लागत असल्याने नागरिकांना बराच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ तालुके असून अहेरी परिसरात ५ तालुके सध्या कार्यरत आहेत. अहेरी परिसराचा ९० टक्के भूभाग दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. तालुक्यांचा आकार मोठा असल्याने ७० ते ८० किमीचे अंतर तुडवून नागरिकांना तालुकास्थळी यावे लागते. त्यामुळे बहुतांश नागरिक तालुकास्थळी येतच नाही व शासकीय योजनांचा लाभही घेत नाही. परिणामी सदर नागरिकांचा आर्थिक विकास थांबला आहे. या बाबीचा विचार करून आणखी सहा तालुके निर्माण करण्यात यावे व अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी आहे. विस्तीर्ण भूभागाचा विचार करून पोलीस विभागाने अहेरी पोलीस जिल्ह्याची निर्मिती केली आहे. अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात अतिरिक्त पोलीस दर्जाचे अधिकारीही देण्यात आले आहे. त्याच धरतीवर अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांकडून आंदोलन छेडून अहेरी जिल्ह्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे शासनाचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. राज्य मंत्रीमंडळाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण केला आहे. त्यानंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या मागणीकडे लक्ष वेधले आहे. (नगर प्रतिनिधी)
अहेरी जिल्ह्याचा मुद्दा विधानसभेत
By admin | Published: June 14, 2014 2:13 AM