भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राने ‘दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र, धोडराज येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ११६ नागरिकांना लर्निंग लायसन्स काढून दिले. त्यासाठी लागणारी अनेक कागदपत्रेही दादालोरा खिडकीच्या माध्यमातून तयार करून देण्यात आली. यामुळे आतापर्यंत विनापरवाना वाहन चालविणाऱ्या नागरिकांना अधिकृतपणे वाहन चालविण्याचा अधिकार मिळाला. त्यांना वाहतुकीच्या नियमांचीही माहिती देण्यात आली.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व सोमय मुंडे, तसेच भामरागडचे एसडीपीओ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
पोलीस मदत केंद्रातील दादालोरा खिडकीत १५ ऑगस्टपासून ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढून देण्याची सुविधा देण्यात आली. ज्यांनी अद्याप लायसन्स काढलेले नाही, त्यांनी आधार कार्ड व आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन धोडराज पोलीस मदत केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले.