लॉकडाऊनमुळे शासनाच्या परिपत्रकानुसार किराणा, मेडिकल व दवाखानेवगळून आज तीन महिन्यांपासून पानटपरी, चहा कॅन्टीन, सलून, कापड, हार्डवेअर, जनरल, फोटो स्टुडिओ, जेलर्स, मोबाईल शॉपी, मंडप डेकोरेशन, कॅटररर्स, हॉटेल, गाड्यांचे शोरुम, गॅरेज आदी सर्व दुकाने बंद आहेत. लग्नसोहळा यावर बंधन आल्याने उन्हाळ्यातील मंडप डेकोरेशन व कॅटरर्स यांचा दोन वर्षांपासून सिझन मार खाल्ला असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. काही
नागरिकांनी किरायाने दुकाने घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने दुकानाचा किराया देणे अवघड होऊन बसले आहे. लॉकडाऊन जरी असले तरी दुकान मालक दर महिन्याला किराया देण्यासाठी तगादा लावत असल्याने काही दुकानदारांवर दुकान रिकामे करण्याची नामुष्की आली आहे. आता दुकानदारांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. काही व्यावसायिकांनी तर पर्याय नसल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टाकून किंवा अन्य व्यवसाय व मजुरी करून आपल्या कुटुंबाचा आधार बनले आहेत.