मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे, तसेच बोरी, झगडवाही, गाहाणेगटा, बेतकाठी, टेकाबेदळ, मांजुखडका अल्लीटोला, बोटेकसाकडून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे; परंतु रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
चौकातील सभागृहाची दुरवस्था
गडचिराेली : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले इंदिरा गांधी चाैकालगत राजीव गांधी सभागृह आहे. या सभागृहात विविध राजकीय पक्ष संघटना व प्रशासनाच्या वतीने बरेच कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. मात्र, या राजीव गांधी सभागृहाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. बऱ्याच नागरिकांनी येथे स्वच्छतागृहारासारखा या सभागृहाचा वापर सुरू केला आहे. सायंकाळच्या वेळेस काही मद्यपी आपला मद्य प्राशनाचा कार्यक्रम आटाेपून घेतात.
मध संकलनातून राेजगारनिर्मिती शक्य
काेरची : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. यातून सहज मध उपलब्ध हाेऊ शकते. यासाठी मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
मिरकलमध्ये खांब लावले; मात्र विजेचा पत्ता नाही
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र वीज पाेहाेचली नाही. वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.
मातीचे बंधारे बांधण्याची मागणी
सिराेंचा : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
कचरा व्यवस्थापनाकडे हाेत आहे दुर्लक्ष
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे भटकत असतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.