जबलपूर-चांदा फोर्ट एक्सप्रेसचा मुहूर्त अद्यापही ठरला नसला तरी जबलपूर रेल्वे स्टेशनवरून सकाळी ५.१५ वाजता प्रस्थान होणार असून चंद्रपूर येथील चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवर दुपारी १.५० वाजता पाेहाेचणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे. चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवरून दुपारी २.५० वाजता प्रस्थान होणार असून रात्री ११.२५ वाजता जबलपूर रेल्वे स्टेशनवर पोहचणार आहे.
जबलपूर चांदा फोर्ट एक्सप्रेस ही गाडी मदन महल, नैनपूर, बालाघाट व गोंदिया या रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील वडसा हे एकमात्र रेल्वे स्टेशन असून येथे या रेल्वेगाडीचा थांबा देण्यात आला नाही. देसाईगंज जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व या ठिकाणी अनेक उद्योग असल्याने या ठिकाणी विविध ठिकाणांहून व्यापारी व उद्योजक यांची वर्दळ असते. त्यामुळे वडसा रेल्वे स्टेशनवर थांबा दिल्यास मोठ्या प्रमाणात वाणिज्यिक व्यवसाय रेल्वे विभागाला मिळू शकते. गोंदिया व चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनच्या अगदी मध्यभागी वडसा रेल्वे स्टेशन असल्याने, वडसा रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी वडसा रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डाॅ. विष्णू वैरागडे यांनी केली आहे.
बाॅक्स....
रेल्वे प्रवाशांसाठी कुचकामी
वडसा रेल्वे स्टेशनमार्गे दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस, कोरबा-यशवंतपूर एक्सप्रेस, चेन्नई-गया एक्सप्रेस या तीन लांब पल्ल्याच्या गाड्या आठवड्यातून ये-जा करीत आहेत. आता जबलपूर चांदा फोर्ट एक्सप्रेस दररोज धावणार असून चौथ्या एक्सप्रेसची भर पडली असली तरी एकही रेल्वेगाडी वडसा रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना या गाड्यांचा काहीच फायदा नाही. परिणामी रेल्वे प्रवाशांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.