गडचिरोली :पोलिस भरती व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास होळीसाठी गावी आल्यावर गोळ्या झाडून संपविल्याची घटना ९ मार्चच्या रात्री घडली होती. दरम्यान, हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी जंगलात दडून बसला होता, त्यास नक्षलविरोधी अभियानच्या जवानांनी सापळा रचून १४ मार्चच्या रात्री अटक केली. त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे (वय २७, रा. मर्दहूर, ता. भामरागड ) असे आरोपीचे नाव आहे. साईनाथ चैतू नरोटी (२६,रा. मर्दहूर, ता. भामरागड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गडचिरोली येथे पदवीचे शिक्षण घेत होता. शिवाय पोलिस भरतीसाठी त्याने प्रयत्न केले होते, याशिवाय स्पर्धा परीक्षेचीही तो तयारी करीत होता. त्यामुळे तो नक्षल्यांच्या निशाण्यावर होता. होळीनिमित्त सुटीवर तो गावी गेला होता. ९ रोजी तो आई-वडिलांसह शेतात असताना त्यास नक्षल्यांच्या वेशभूषेतील तिघांनी बाजूला नेले, त्यानंतर गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने खळबळ उडाली होती.
बोलण्यासाठी नेले अन् गोळ्या झाडून मारले, अडीच तासांनंतर मिळाला मृतदेह
पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या भामरागड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर होती. दरम्यान, हत्येमागे प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे हा असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानला होती. त्यानुसार, त्यास १४ रोजी मर्दहूरपासून दहा किलोमीटरवरील जंगलात मोठ्या शिताफीने शोधमोहीम राबवून बेड्या ठोकल्या. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान)अनुज तारे, अपर अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, अपर अधीक्षक अहेरी यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
क्रूरकर्मा प्रकाशवर खुनाचे दहा गुन्हे
प्रकाश ऊर्फ आडवे गावडे हा कुख्यात नक्षलवादी असून, तो सन २००० पासून या चळवळीशी जोडला गेलेला आहे. पेरमिली दलमध्ये तो सदस्य म्हणून भरती झाली होती. गोंदियातील उत्तरगडमध्ये डेप्युटी कमांडर, प्लाटून कमांडर म्हणूनही त्याने काम केले. त्याच्यावर तब्बल २२ गुन्हे आहेत. त्यापैकी दहा गुन्हे खुनाचे आहेत. आठ चकमक, एक दरोडा, दोन जाळपोळ व इतर एक अशी त्याची क्राईम हिस्ट्री आहे.