गडचिरोली : गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ करून भीषण भूसुरूंग स्फोट घडविला होता, त्या घटनेतील तीन सूत्रधारांपैकी एक असलेला जहाल नक्षलवादी दिनकर गोटा आणि त्याची पत्नी सुनंदा यांना पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.४) अटक केली. दरम्यान या कारवाईवेळी झालेल्या चकमकीत नक्षल्यांचा कॅम्पही पोलिसांनी उद्ध्वस्त केला. नक्षलवादी मात्र जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले.दिनकर हा उत्तर गडचिरोली आणि कोरची दलमच्या विभागीय समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १६ लाख तर कोरची दलमची सदस्य असलेली त्याची पत्नी सुनंदा हिच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे पहाटे नक्षलवाद्यांनी ३६ वाहने जाळल्यानंतरत्याच मार्गावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान आणि एका खासगी वाहनचालकाला जीव गमवावा लागला होता. भूसुरूंगाच्या घटनेचा तपास नंतर राष्टÑीय तपास संस्थेने हाती घेतला तर वाहनांच्या जाळपोळीचा तपास जिल्हा पोलीस दलाकडेच आहे. दोन्ही घटनेतील बहुतांश आरोपी सारखेच असले तरी जाळपोळीच्या घटनेसंदर्भातील ही पहिलीच अटक आहे. दिनकरवर विविध पोलीस ठाण्यात १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात ३३ खुनांचा समावेश आहे. नक्षली सुनंदा कोरेटी हिच्यावर ३८ गंभीर गुन्हे आहेत. ती दिनकरची दुसरी पत्नी म्हणून वावरत असून पहिल्या पत्नीने यापूर्वीच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.>चकमकीत नक्षलींचा कॅम्प उद्ध्वस्तकुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा भागातील गांगीन जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी मोठी चकमक उडाली. तेथे लागलेल्या शिबिरात मोठ्या संख्येने नक्षलवादी जमले होते. परंतु नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षली हल्ल्याला तोंड देत त्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले. नक्षलवादी मात्र जंगलात पळून गेले.
जहाल नक्षली दिनकर, पत्नी सुनंदाला अटक, विशेष पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:36 AM