संजय तिपाले
गडचिरोली : विविध हिंसक गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याने २४ जुलैरोजी सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. लच्चू करीया ताडो (४५, रा.भटपार ता.भामरागड) असे त्याचे नाव असून तो भामरागड दलममध्ये सक्रिय होता. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.
२०१२ साली नक्षलवाद्यांच्या जनमिलिशिया सदस्य म्हणून सहभागी झालेला लच्चू ताडो हा नक्षलवाद्यांना विविध साहित्य पुरविणे, दारुगोळा सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवणे, पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, रेकी करणे आदी काम करायचा. २०२३ मध्ये त्याला बढती मिळून भामरागड दलाम सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर जाळपोळ, स्फोटके पुरून ठेवणे यासारख्या दोन गुन्ह्यांत त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर शासनाने २ लाखाचे बक्षीस ठेवले होते. मुख्य प्रवाहात आल्याने लच्चू याला पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ४.५० लक्ष देण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी केलेल्या नक्षलविरोधी अभियान आणि शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे दोन वर्षात २२ तर आजपर्यंत तब्बल ६७० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ बटालियन ३७ चे कमांडंट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली.