गडचिरोली: दोन पोलिस जवानांसह आठ निष्पाप लोकांची हत्या , दोन दरोडे तसेच चकमकीचे गुन्हे नोंद असलेल्या एका नक्षलवाद्याला १८ एप्रिल रोजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रस्तावित खाणी व रस्त्यांना विरोध करत तोडगट्टा येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या स्थळापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील हाचबोडी (ता.एटापल्ली) जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून ही कारवाई करण्यात आली.
साधू ऊर्फ काल्या ऊर्फ संजय नरोटे (वय ३१, रा. झारेवाडा ता. एटापल्ली) असे त्या नक्षल्याचे नाव आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवाद्यांचा टीसीओसी (टेक्निकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) कालावधी असतो. या दरम्यान ते पोलिसांवर हल्ला करणे, पोलिसांची शस्त्रे लुटूननेणे, शासकीय मालमत्तांचे नुकसान करणे अशा घातक कृती करतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने नक्षलविरोधी अभियान राबविले जाते. या अभियानादरम्यान १८ एप्रिल रोजी गोपनिय माहितीआधारे पोलिसांनी गट्टा (जां.) पोलिस मदत केंद्र हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात साधू नरोटे याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक (अभियान) , अनुज तारे , अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता , अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख उपस्थित होते.साधूवर होते दोन लाखांचे बक्षीससाधू नरोटे याच्यावर गंभीर स्वरुपाचे २३ गुन्हे नोंद आहेत. त्यात १२ चकमक, दोन पोलिस जवानांसहीत एकूण आठ खून, दोन जाळपोळ व एक दरोडा या गुन्ह्यांचा समावेश आहे. धुळेपल्ली , कोदुर , टेकामेड्डा , गोरगुड्डा , गुंडरवाही या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विशेष म्हणजे तीन आठवड्यांपूर्वीच त्याने नक्षल चळवळ सोडली होती. मात्र, तो घरी बसून नक्षल्यांसाठी काम करायचा, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.