कमलापूर : पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात येते. जिल्ह्याच्या दुर्गम भागामध्ये जनजागरण मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे. रेपनपल्ली उपपोलीस ठाण्याच्या विद्यमाने चिंतलगुडम येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी अतुल देशकर, रेपनपल्लीचे ग्रामसेवक आर. एस. बाटवे, कमलापूरचे ग्रामसेवक पाल, जिमलगट्टाचे पोलीस उपनिरिक्षक वांगनेकर, मरपल्लीचे पोलीस उपनिरिक्षक ताटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंदेवार आदी उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यादरम्यान व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान यावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. व्याहाड येथील जनजागृतीत कला व क्रीडा मंडळाने ही जबाबदारी पार पाडली. या जनजागरण मेळाव्यासाठी नैनगुडम, लिंगमपल्ली, येडमपल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यशवंत काळे यांनी स्वत:च्या विकासासोबत कुटुंबाचा व गावाचा विकासही साधण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन जनतेला केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रभारी अधिकारी आर. बी. रोडे यांनी सहकार्य केले. संचालन मनोज देशभतार यांनी तर प्रास्ताविक डी. ए. पुके व आभार दुरपडे यांनी मानले. (वार्ताहर)
दुर्गम भागात जनजागरण मेळाव्यांना सुरूवात
By admin | Published: November 22, 2014 11:01 PM