गडचिरोली : छत्तीसगडमधील रहिवासी आणि सध्या तेथील परालकोट दलममध्ये सीएनएम (चेतना नाट्यकला मंच) कमांडर या पदावर कार्यरत असलेल्या जहाल नक्षलवाद्याला आणि एटापल्ली तालुक्यातील एका जनमिलिशिया सदस्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेला मंगेश उर्फ कांडेराम पोटावी (३३ वर्षे) रा. होरादी, जि. नारायणपूर (छत्तीसगड) हा २००५ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. सध्या तो चेतना नाट्यकला मंचचा कमांडर म्हणून कार्यरत होता. युवा वर्गाला नक्षल दलममध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात यांची भूमिका महत्त्वाची असते. त्याच्यावर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गारपा जंगल परिसरात पोलिसांसाठी ॲम्बुश लावण्याचा तसेच चकमक, जाळपोळ, दरोडा, जीव ठार मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. दि.२८ ला तो कसनसूर गावात आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दुसरा आरोपी चिन्ना मासे झोरे (४० वर्षे) हा २००५ पासून गट्टा दलममध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावरही स्फोट, चकमक, वाहनांची जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत.