लाभ घेण्याचे आवाहन : उपाध्यक्ष व नगर सेविकांनी केली नागरिकांशी चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी विस्तारक योजनेअंतर्गत लांझेडा प्रभाग क्र. २ चे विस्तार प्रमुख म्हणून पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांची भाजपतर्फे निवड करण्यात आली. या योजनेच्या उपक्रमाअंतर्गत उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर व नगरसेविका वर्षा नैताम यांनी लांझेडा भागात जाऊन विविध शासकीय योजनांची जनजागृती केली. नागरिकांच्या प्रवेशद्वारावर स्टिकर लावून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी रामचंद्र नैताम, भाजपचे शहर सचिव नरेंद्र भांडेकर, मंगेश वैरागडे, विजय पिपरे, जयश्री लटारे, सोनी नैताम यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी भाजप केंद्र व राज्य सरकारच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, पीक विमा, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सिंचन विहीर, माती परीक्षण, पीक कर्ज पुनर्गठन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. सदर योजनांचा लाभ लांझेडा भागातील शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी यावेळी केले. समस्या जाणल्या पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर व नगर सेविका वर्षा नैताम यांनी लांझेडा भागातील नाली, रस्ते, पथदिवे व इतर मूलभूत सुविधा जाणून घेतल्या. सदर समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही मुनघाडकर यांनी नागरिकांना दिली.
लांझेडात शासकीय योजनांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2017 2:03 AM