लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनविभाग आणि महसूल विभागाच्या तब्बल २८ एकर जमिनीवर अतिक्रमण करून ती हडपण्याचा एका कुटुंबाचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. याप्रकरणी त्या कुटुंबावर गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणात संबंधित कुटुंबाने जेसीबी लावून तब्बल १४०८ झाडे पाडल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. एवढ्या राष्ट्रीय संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या त्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हा प्रकार गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा या गावाजवळ घडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले यांच्यासह त्यांची दोन मुले प्रणय आणि प्रांजल तसेच अतिक्रमणास मदत केल्याच्या आरोपाखाली निळकंठ सिडाम अशा चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. यापैकी सिडामला अटकही केली, पण त्याला जामीन मिळाला.प्राप्त माहितीनुसार, फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे खोदून त्याखाली गाडून ठेवल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत आढळल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. गावकऱ्यांनी वेळीच या प्रकाराची तक्रार वनविभागाकडे केल्यानंतर वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कनिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई आणि तपासासाठी सूचना केल्या.
दुसऱ्या दिवशी येतो, असे सांगून कुटुंब गायब- या प्रकरणी जबाब घेण्यासाठी फुलझेले कुटुंबातील तीनही सदस्यांना वनविभागाने १४ ऑगस्ट रोजी नोटीस देऊन लगेच येण्यास सांगितले. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी जबाब देण्यासाठी येतो, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना परत पाठविले. पण त्यानंतर हे कुटुंब गायब झाले. जिल्हा परिषदेतील ड्युटीवरही गायत्री फुलझेले हजर नसल्याचे सांगितले जाते. वन विभागाला त्यांच्या येण्याची प्रतीक्षा लागली आहे.
...म्हणून वाढले वाघाचे हल्ले?- दरम्यान, ज्या चुरचुरा परिसरातील जंगलाच्या साहाय्याने वाघाचा वावर होता तेच जंगल भुईसपाट केल्यामुळे वाघाने आपला मोर्चा गावाच्या आणखी जवळ वळविला असून त्यामुळे वाघाचे हल्ले वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनजमिनीवर अशा पद्धतीने वाढत असलेले मानवी अतिक्रमणच जंगली प्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जाते. याबद्दल नागरिकांमध्ये संताप आहे.