लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम अखेर प्रशासनाच्या खंबीर भूमिकेमुळे सुरू झाली. यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बस थांबा ते मच्छी मार्केट या मार्गावरील दिग्गज व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर जेसीबी चालवून ती काढण्यास सुरूवात झाली. कुठल्याही दबावाला बळी न पडता नगर परिषदेने अतिक्रमण काढल्याने रस्त्यालगत बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण करणारे चांगलेच धास्तावले आहेत. मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या नेतृत्वात दि. २६ रोजी अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा बसस्थानक ते मच्छी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमणाकडे वळला. या मार्गावरील काही इमारतींनी अतिरिक्त जागेवर बांधकाम केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी १० वाजल्यापासून नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. यादरम्यान काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बड्या राजकीय नेत्यांना फोन करून मुख्याधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दबावाला न जुमानता अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले. परंतु, ज्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली, त्या रस्त्यावर काही लोक अतिरिक्त जागेवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते. ते अतिक्रमण मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा काढतील का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यांनी ते बिनधास्तपणे काढले. गुरुवारी नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटरमधील अतिक्रमण तसेच फवारा चौक ते नगर परिषद कार्यालयाकडील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.