कुरखेडातील घटना : ६२ हजार ८८० रूपयांचा ऐवज लंपासकुरखेडा : कुरखेडाच्या माजी सरपंच तथा विद्यमान नगर पंचायत सभापती आशा तुलावी यांच्या आझाद वॉर्डातील घराची मागची खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश केला व कपाटात ठेवलेले ६२ हजार ८८० रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सदर चोरी सोमवारी भर दुपारी १२.३० ते २.४५ वाजताच्या सुमारास घडली.आशा तुलावी या सोमवारी दुपारी १२.३० वाजता घरातील समोरच्या दरवाजाला कुलूप लावून वनसमितीच्या बैठकीकरिता घराशेजारीच असलेल्या वनकार्यालयात गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील बाजुला असलेली सिमेंटची खिडकी फोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटात ठेवलेले टॉप, नथनी, दोन अंगठ्या असा एकूण ६२ हजार ८८० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. आशा तुलावी या बैठक आटोपून दुपारी ३ वाजता घरी येताच त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची तक्रार कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी घटनास्थळावर येत घटनेचा पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरोेधात कुरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार विलास सुपे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाटी, सहायक फौजदार भरत डांगे, हवालदार सोरते करीत आहेत. या चोरीच्या घटनेत किमान दोन व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकटा व्यक्ती समोर उभा राहून तुलावी कुटुंबापैैकी कुणी येत आहे काय, याची शहानिशा करीत असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
भर दिवसा दागिन्यांची चोरी
By admin | Published: October 19, 2016 2:26 AM