आॅनलाईन लोकमतगडचिरोली : वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील जंगलातून होणारी मौल्यवान सागवानाची तस्करी रोखण्यासाठी तीनही राज्यातील वन अधिकारी संयुक्त मोहीम राबविणार आहेत.यासंदर्भात त्यांची एक संयुक्त बैठकही नुकतीच झाली. तीनही राज्यातील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बैठकीला तेलंगणाचे एम. जे. अकबर, छत्तीसगडचे गुरूनाथन, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.एल. येटबॉन, सिरोंचा येथील उपवनसंरक्षक तुषार चौहान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे. त्यामुळे वनतस्कर त्या राज्यांमार्गे आपला कार्यभाग साधतात. त्यामुळेच संयुक्त मोहिमेतून या वनतस्करीला आळा बसेल असा विश्वास वन अधिकाऱ्यांना आहे.नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात ७७ टक्के भौगोलिक क्षेत्र वनांनी व्यापले आहे. वनतस्करांच्या तावडीत सापडून ही मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सागवानाची झाडे कापून त्यांची बैलगाडी व इतर वाहनांमधून तसेच नदीच्या प्रवाहातून तेलंगणा राज्यात तस्करी केली जाते. अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीनंतर सिंरोचा परिसरासह छत्तीसगड मध्ये वनतस्करांवर कारवाया सुरू झाल्याचेही त्यांनी वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
सीमा तपासणी नाके बनविणारतीनही राज्यांमधील वन अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत गुड्डीगूडम व कालेश्वरम येथे सीमा तपासणी नाका (चेक पोस्ट) बनविणे, सुरक्षा शिबिरांचे आयोजन, वनरक्षकांच्या सुरक्षेसाठी योग्य पाऊल उचलणे, त्यांना पोलीस आणि कमांडोंप्रमाणे प्रशिक्षण देणे, पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाया करणे, माहितीचे स्त्रोत वाढविणे, तेलंगणा राज्याजवळील सोमनूरजवळ तीनही राज्यांचे वनकर्मचारी तैनात करणे, संयुक्त गस्त वाढविणे आदी मुद्यांवर चर्चा झाली.