जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर १०८ क्रमांकासाठी असलेल्या १० आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या ८ रुग्णवाहिकांना कोरोना रुग्णांच्या सेवेत जुंपण्यात आले. याशिवाय १२ खासगी रुग्णवाहिकाही सरकारी सेवेत घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण ३० रुग्णवाहिका सध्या कोरोना रुग्णांना नेण्या-आणण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्यावर जवळपास ६५ चालक आळीपाळीने ड्युटी करतात. याशिवाय गडचिरोली नगर परिषदेची एक आणि भामरागड येथील एक अशा दोन शववाहिका सेवेत आहेत. मात्र कोरोना रुग्ण किंवा कोरोनाने मरण पावणाऱ्यांचे मृतदेह पोहोचवताना या सर्व चालकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची किमया साधली आहे. आतापर्यंत त्यांच्यापैकी कोणीली कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही.
पीपीई किटचा वापर मोजकाच, पण ग्लोव्ज-सॅनिटायझर वापरतो
- आम्हाला पीपीई किट, हॅन्डग्लोव्ह, मास्क, सॅनिटायझर अशा सर्व वस्तू दिल्या जातात. कोरोना रुग्णाला पोहोचविताना या सर्वांचा वापर करणे गरजेचे असते. पण आम्हाला दार उघडणे, बंद करणे यापलीकडे त्यांचा जास्त संपर्क येत नाही. त्यामुळे पीपीई किटचा वापर मोजक्याच प्रमाणात होतो. बाकी सर्व खबरदारी आम्ही घेतो. त्यामुळे आजपर्यंत तरी काही झालेले नाही.
- भास्कर उसेंडी, रुग्णवाहिका चालक, मुलचेरा
- आम्ही सलग २४ तास ड्युटी करतो. त्यानंतरचे २४ तास दुसरा चालक ड्युटी करतो. अशा ड्युटीची सवय झाली आहे. कधीकधी २४ तासात फार कमी आराम करायला मिळतो. पण त्या तुलनेत मोबदला मात्र कमी मिळतो. पुण्याच्या व्हीव्हीजी कंपनीमार्फत आमची भरती झाली होती. कोरोनाकाळात तरी पगार वाढवून द्यावा ही अपेक्षा आहे.
- दीपक चापले, रुग्णवाहिका चालक, लांझेडा
- कोरोनाने अलीकडे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढल्याने आमचे कामही वाढले आहे. सुरुवातीला कोरोनाची थोडी भीती वाटत होती. पण आता काही वाटत नाही. पीपीई किटपासून सर्व सर्व साहित्य मिळते. आम्ही ते नियमित वापरतो. पुढेही वापरणार. त्यामुळे आम्हाला कोरोना होईल असे वाटत नाही.
- राकेश केराम, शववाहिका चालक, न.प. गडचिरोली