झिंगानूर परिसरात पक्के रस्ते, आरोग्य, वीज आदींसह अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. परिसरातील बारमाही वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर पुलाची निर्मिती न झाल्याने दुर्गम भागातील नागरिक आजही पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात. झिंगानूर परिसरातील नैनगुंडा नाल्यावर या परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी ३० वर्षांपूर्वी रपटा बांधण्यात आला. मात्र, या रपट्याच्या देखभालीकडे सातत्याने कानाडोळा करण्यात आल्याने हा रपटाच नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रपट्यावरील सळाखी बाहेर आल्या आहेत. रपट्यावरून पाणी वाहत असताना या सळाखींचा अंदाज येत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रपट्याच्या दुरवस्थेमुळे यंदाच्या पावसाळ्यात सदर रपटा वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशी दुर्घटना घडल्यास परिसरातील ३० गावांतील नागरिकांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटू शकताे.
बॉक्स
रपट्यावर पडला मोठा खड्डा
नैनगुंडा नाल्यावरील रपट्याची उंची अत्यंत कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. त्यातच या रपट्यावर मोठा खड्डा पडला आहे. जरासा पाऊस आल्यानंतरही रपट्यावरून पाणी वाहते. त्यामुळे अनेकजण येथून प्रवास करतात. सध्या रपट्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यामुळे अनेकदा दुचाकी वाहनधारक खाली पडले आहेत. याशिवाय परिसरातील अन्य रस्तेही दुरवस्थेत आहेत; परंतु अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधीही या समस्येकडे कानाडाेळा करीत आहेत. ही समस्या लवकर मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.