गडचिरोली : गेल्या वर्षभराच्या कोरोनाकाळात एसटीचा प्रवास करणे मोठे जोखमीचे मानले जात होते. प्रवासासाठी होणारी गर्दी आणि सुरक्षा उपायांची कमतरता हे त्यामागील मुख्य कारण होते. पण आताच्या घडीला एसटीच्या प्रवाशांसह चालक-वाहकांनाही कोरोनाच्या नियमांची शिस्त लागल्याचे दिसून येत आहे. काही अपवाद वगळता बहुतांश प्रवासी नाकातोंड मास्क किंवा रुमालाने झाकून प्रवास करत असल्यामुळे त्यांच्यात आता कोरोनाबद्दल जागृती आल्याचे बुधवारी दिसून आले.
‘लोकमत’ प्रतिनिधीने गडचिरोली ते नागपूर प्रवास करून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोरोनाच्या नियमांचे किती पालन केले जात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी एसटी बसेसला मिळाल्याने प्रवासी वाढण्यासोबतच कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत असल्याचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात एसटीच्या चालक-वाहकांसोबत प्रवासीही शिस्त पाळताना दिसून आले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये असलेली ही शिस्त छोट्या प्रवासात मात्र तेवढ्या प्रमाणात पाळली जात नव्हती. ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसगाड्यांमध्ये अनेक जण मास्क न लावताच प्रवास करताना दिसले.
(बॉक्स)
दोन तासांच्या प्रवासात पूर्णवेळ मास्क लावून
चालक
गडचिरोली ते नागभीड या दोन तासांच्या प्रवासात चालक पूर्ण वेळ मास्क लावून गाडी चालवत होते.
वाहक
वाहकानेही बराच वेळ मास्क लावला होता. पण बसने थांबा सोडल्यानंतर दुसरा थांबा येण्यापूर्वी ते थोडा वेळ मास्क सरकवत होते.
प्रवासी
काही प्रवासी चढताना मास्क लावून नव्हते. वाहकाने सूचना करताच त्यांनी खाली सरकलेले मास्क नाकावर घेतले.
लोकमतचा एसटी प्रवास -
बस - गडचिरोली-नागपूर
वेळ - सायंकाळी ५.३० वाजता
प्रवासी - २२
(बॉक्स)
कुठल्या बस स्थानकावर किती चढले-उतरले
पोर्ला
गडचिरोली सोडल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पोर्ला या स्टॉपवर ५ प्रवासी उतरले आणि एक चढला. सर्वजणांचे नाक-तोंड झाकून होते.
आरमोरी-
आरमोरीत दोन ठिकाणी बस थांबली त्यात ८ प्रवासी उतरले तर १२ चढले. त्यापैकी काही जण विनामास्क होते. पण नंतर त्यांनीही रूमाल लावला.
ब्रह्मपुरी
बस चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतील ब्रह्मपुरी स्टॉपवर येताच ७ जण उतरले. तेथून ५ जण चढले. ते सर्वजण नाक-तोंड झाकूनच होते.
नागभीड
नागपूरच्या दिशेने जाताना नागभीड स्थानकावर ५ प्रवासी उतरले. तेथून नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी ९ प्रवासी चढले. त्यातील तिघे विनामास्क होते.