आलापल्ली ते सिरोंचादरम्यानचा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. येथून दरराेज अवजड वाहनांचे आवागमन असते. दरराेजच्या अवजड वाहनांच्या आवागमनामुळे माेठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी या मार्गाने प्रवास करून अनुभव घ्यावा. तेव्हाच त्यांना या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचे हाल काय हाेत आहेत, याची जाणीव हाेईल, असा सवालही नागरिकांनी केला आहे.
आलापल्लीवरून एसटी निघाल्यावर सिरोंचाला पोहाेचेलच याचा नेम नसताे. यापूर्वी अनेक ट्रक, बसेस तसेच अन्य अवजड वाहने रस्त्यात फसल्याच्या घटना घडल्या आहेत. बरेचदा प्रवाशांना जंगलात मार्ग सुरळीत होईपर्यंत अडकून राहावे लागते. कोणताही अडथळा न येता वाहनाने गेले तरी प्रवासाला चार तास लागतात. उलट अंगदुखी, कमरदुखी, मानदुखी आदी त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर एसटी तासी पंचवीस किलोमीटर धावत आहे. या मार्गाने गडचिरोली अथवा चंद्रपूरला कामानिमित्त गेलेला प्रवासी त्याच दिवशी परत येणे शक्य होत नाही. विनाकारण मुक्काम करावा लागतो. याशिवाय सदर मार्गावर प्रवास करताना अपघात होऊन अनेक लाेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीसुद्धा शासन-प्रशासन जागे होणार नाही काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
बाॅक्स
नियमांच्या अंमलबजावणीचा अभाव
सिराेंचा-आलापल्ली मार्गावरून अवजड अतिलांब वाहनांना प्रवेश निषेध या आशयाचे फलक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गडचिरोलीकडून सिरोंचात लावण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मात्र या अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी या मार्गाने माेठी व अवजड वाहने सर्रास ये-जा करीत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेला अधिकारीच जबाबदार असल्याचा आराेपही नागरिकांकडून हाेत आहे.
140921\59060321img_20210807_111728.jpg
सिरोंचा आलापल्ली मार्गाची बदतर प्रवास!