प्रशासन सुस्त : विद्यार्थ्यांसह नागरिकांना कापावे लागते अधिकचे १५ किमी अंतर; गावकऱ्यांच्या नशिबी कायम नरकयातनाच धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने पूल बांधण्यात आला. मात्र दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते. राजोलीवासीयांच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. धानोरा तालुक्यातील राजोली हे २५० कुटुंबाची वस्ती असलेले गाव आहे. या गावाला कठाणी नदीने अर्ध्या भागात वेढा दिला आहे. येथील नागरिकांना कठाणी नदीपात्रातूनच गावाबाहेर पडावे लागते. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन पाच वर्षांपूर्वी राजोली नजीक कठाणी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नदीचे पात्र विस्तारले. याशिवाय रपटा वाहून गेला व पूल अर्धवट राहिला . त्यामुळे पावसाळ्यात राजोली गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सदर पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रखडले. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे राजोलीवासीयांनी दुरावस्थेत असलेल्या या पुलाची श्रमदानातून दुरूस्ती केली. तसेच कच्चा रपटा तयार केला. त्यामुळे राजोलीवासीयांना आवागमनाची सुविधा झाली. मात्र त्यानंतर पुन्हा रपटा खचल्याने व नदीचे पात्र विस्तारल्याने यंदाही येण्याजाण्याची समस्या ऐरणीवर आली आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना नवरगाव- सोडेमार्गे धानोरा येथे १५ किमी अंतर अधिकचे कापून पोहोचावे लागते. (तालुका प्रतिनिधी) रस्ता मंजूर;मात्र पुलाबाबत हालचाली नाही मुख्यमंत्री सडक योजनेतून राजोली गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यासाठी निधीची तरतुदही करण्यात आली आहे. मात्र अर्धवट स्थितीत असलेला पूल नव्याने उभारण्यासंदर्भात प्रशासनाच्या हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे राजोली वासीयांची निराशा झाली आहे. दरवर्षी चार महिन्यांची शाळा बुडते राजोली येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या पलीकडच्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना धानोरा, चातगाव, गिरोला येथे जावे लागते. राजोली येथील ५० वर विद्यार्थी इयत्ता आठवीपासून बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी आयटीआय तसेच संगणक शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात कठाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे राजोली गावानजीक कठाणी नदीवर असलेल्या अर्धवट पुलामुळे मार्ग बंद होतो. संततधार पावसामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात पुलाअभावी या गावातील ५० वर विद्यार्थ्यांची चार महिन्यांची शाळा बुडते. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो.
राजोलीच्या अर्धवट पुलाने प्रवास जिकरीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 1:43 AM